Saturday 9 May 2020

हास्य धमाका

नेम
सिंह मरून पडला होता.
खुशालरावांनी गोळी झाडली होती. छबुरावांनीही गोळी घातली होती. सिंहाच्या मस्तकावर जखम होती. सिंहाच्या मागच्या पायावरही एक जखम होती. पण मस्तकावर कोणाची गोळी लागली? छबुरावाने आत्मविश्वासाने सांगितलं,"खुशाल, तुझी गोळी मुद्दलात सिंहाच्या जवळपास आली नाही. ती सिंहाला लागतेच आहे कशाला?"
खुशाल म्हणाला,"छब्या, किती खोटं बोलशील? सिंहाला दोन गोळ्या लागल्या आहेत, दोन जखमा झाल्या आहेत. एवढं तरी कबूल कर..."

"दोन्ही जखमा माझ्या गोळीनेच झाल्या आहेत."
"मस्तकावरची जखम आणि मागच्या पायावरही जखम या दोन्ही जखमा एका गोळीमुळे?"
"मग त्यात काय झालं? सिंह मागच्या पायाने मस्तक खाजवत होता तेव्हाच तर मी गोळी घातली होती."
छबुरावांनी पटणारा खुलासा केला.
**********
चिनू-आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांना काही कळत नाही.
आई-का गं?
चिनू- अगं, मांजराचं चित्र काढलं.तर म्हणे हे काय आहे?
**********
शत्रूवर प्रेम !
गुरूजींनी अजयला शाळेत उशीरा येण्याबद्दल विचारलं, तेव्हा तो म्हणाला, 'गुरूजी, इतका आळस आला होता की, उठायलाच उशीर झाला'. त्यावर गुरूजी म्हणाले, 'अरे, आळस हा आपला शत्रू आहे, हे मी शिकवलं होतं. इतक्यात विसरलास?'
अजय उत्तरला, 'गुरूजी, ते कसं विसरणार? परंतु शत्रूवर प्रेम करा, हेही तुम्हीच शिकवलंय ना!'
***********
प्रेम
लोचट गोविंदानं करिष्मा पेंडसेला गाठलं. गोविंदा तिला ओळखत
होता असं नव्हे; पण देखणी मुलगी दिसली की, गोविंदा पाघळायचाच.
अंगविक्षेप करत गोविंदा म्हणाला, "हॅलो, सोनिया गंधे, कशी
आहेस? माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे."
करिष्मा संतापली, "हे बघ, तुझं माझ्यावर प्रेम वगैरे काही नाही
आणि माझं नाव सोनिया गंधे नाही. मी करिष्मा पेंडसे आहे."
गोविंदानं लगेच दुरुस्ती केली, "हाय करिष्मा! हाऊ आर यू? माझं
तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे."
************
अतीच!
"डॉक्टर, अती तेथे माती, असं म्हणतात; पण आमच्या घरी हे माती खाणं अतीच झालं आहे. काय करावं हेच कळत नाही.
सकाळी मी उठतो आणि पाहतो तर बागेत चिरंजीव माती खाताना दिसतात. दुपारी मी इकडे जेवायला बसतो आणि तिकडे आमचे सुपुत्र माती चघळतात. संध्याकाळी ऑफिसातून यावं तर आमचे कुलदीपक बागेत आणि त्यांच्या तोंडात माती.''
"भगवंतराव, जरा सबुरीनं घ्या. मुलांचं हे असंच असतं. वय वाढेल तशी ही सवय जाईल. धीरानं घ्या."
"डॉक्टर, मी एक धीरानं घेईन; पण आमच्या सूनबाईला नवऱ्याच हे माती खाणं मुळीच सहन होत नाही.'
***********
त्याचा दोष?
विमलकाकू - काय हो , तीस वर्षांचा झाला तरी तुमच्या बाळ्याला अक्कल कशी ती नाही आली अजून?
यशोदाकाकू - त्याचा काही दोष नाही हो. त्याला विसाव्या वर्षीच अक्कलदाढ आली आणि दातांच्या डॉक्टराने शेजारच्या दुखर्‍या दातावर उपचार करताना चुकून अक्कलदाढच काढली. मग तो बिचारा तरी काय करणार?
*************
शिकवणी
वायचळ हे वयस्कर शिंपी रेवतीबाईंनी बोलावल्याप्रमाणे खिडक्यादारांच्या पडद्यांची मापं घेण्यासाठी बरोबर चार वाजता बंगल्यावर पोचले.
आपण वायचळांना बोलावलं आहे हे रेवतीबाई विसरल्या आणि
चारच्या महिला मंडळाच्या बैठकीला न विसरता निघून गेल्या.
वायचळांनी दरवाजावरची घंटी वाजवली.
"कोण आहे?" आतून आवाज आला.
“मी वायचळ शिंपी."
"कोण आहे?"
"मी वायचळ शिपी." वायचळांनी मोठ्यानं ओरडून सांगितलं. असं बराच वेळ चाललं. आपल्या गरीब शिंप्याच्या जीवाशी रेवतीबाईंनी हा कसला खेळ मांडला म्हणायचा?
वायचळ घंटा दाबत होते, 'कोण आहे?' हा प्रश्न ऐक आल्यावर
वायचळ मोठ्यानं ओरडून 'मी वायचळ शिंपी,' हे सांगत होते.
शेवटी वायचळ चक्कर येऊन दाराशी पडले. शेजारी जमले. वायचळ
शिंपी तसे फारसे कोणाला माहीत नव्हते.
कोणीतरी विचारलं, “हे कोण आहेत?"
हा प्रश्न ऐकू आल्यानंतर आतून पोपटानं उत्तर दिलं, "मी वायचळ शिपी."
***********
खंडणी
शेठ हिरालाल यांची पत्नी शांताबेन किती कटकटी व त्रासदायक होती,याची कल्पना कोणालाही करता येणं शक्य नव्हतं. पण शांताबेनला किडनॅप करून पळवून नेणाऱ्या रोशन मलबारी ऊर्फ चेंड्या या गुंडाला नीट कल्पना आली आणि म्हणून तर त्यानं धमकी दिली,"हिरालाल शेठ, ताबडतोब पाच लाख रुपये पाठवा. नाहीतर शांताबेनला थेट बंगल्यावर आणून पोहचवू."
पोलीस इन्स्पेक्टर गोवंडे या खंडणीच्या जगावेगळ्या निरोपानं चक्रावले. पण शेठ हिरालाल यांनी जग पाहिलं होतं. ते चेंड्याला धडा शिकवणार होते. त्यांनी उलट कळवलं,"पन्नास हजार रुपये ताबडतोब पाठवत आहे.उरलेल्या पैशांचा हळूहळू बंदोबस्त करतो आहे."
हिरालालला कोणीकडून तरी वेळ काढायचा होता. रोशन मलबारीला शांताबेनच धडा शिकवणार होती.
************

No comments:

Post a Comment