Thursday 7 May 2020

हास्याचे फवारे....

प्राध्यापक बबनरावांना वाचनाचा भारी छंद! कॉलेज मध्ये असोत किंवा घरात, सतत काही ना काही वाचत असत. कॉलेजमध्ये ग्रंथालय होते. घरात तर त्यांनी वाचनासाठी  आपली एक स्वतंत्र खोली केली होती. आज बायकोनं चारदा आठवण करून दिली. पण स्वारी रात्री दहा वाजता आपल्या खोलीतून बाहेर आली.
त्यांची बायको शेवंता लाडानं म्हणाली,"इतकं काय असतं बरं त्या पुस्तकात? जेवण आल्यावर जरा करमणुकीचं, आनंदाचं असं काहीतरी करावं माणसानं!"

हे बोलताना शेवंता काळजानं बरबटलेले डोळे फडफडवत होती. ओठांवर लिपस्टिक चढवलेली होती.  बबनरावांना काही कळेना. काय करावं बरं! जेवल्यानंतर आनंदाचं, करमणुकीचं काय करावं? हा विचार करतच बबनराव उठले. सगळं आटोपल्यावर शेवंता त्यांच्याजवळ आली. लाडिकवाळपणे पण सूचक म्हणाली," मला तर बाई फार झोप येते आहे."
बबनराव म्हणाले," ठीक आहे!मग तू झोप. मलाही एक आनंदाची गोष्ट आठवली आहे. आजच आणलेलं नवीन पुस्तक वाचत बसतो." आणि बबनराव आपल्या खोलीत शिरलेदेखील.
************
मारुती दवाखान्यात शिरला. त्याचा मित्र गण्या चार दिवसांपूर्वी हार्टच्या तक्रारीवरून दवाखान्यात दाखल झाला होता. गण्याजवळ जातोय तर काय! माधुरी त्याला सुई टोचत होती. माधुरी इथली नर्स. मागे मारूतीही पोटाच्या तक्रारीवरून याच दवाखान्यात ऍडमिट होता. माधुरीमुळं तो लवकर बरा झाला होता. मित्राला हीच नर्स मिळाल्यामुळे गण्याची चंगळ झाली असेल म्हणून त्याने माधुरीला विचारलं," काय म्हणतेय आमच्या मित्राची प्रगती?"
"हे तुमचे मित्र का? कसली डोंबलाची प्रगती! उद्या यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. पण काहीच नाही... तुम्ही आला होतात तेव्हा तुम्ही दुसऱ्याच दिवशी किती प्रगती केली होती. ते दिवस मला अजून आठवतात." आणि  असे म्हणून माधुरी लाजली.
***************
सविताबाई बँकेत कामाला होत्या. सालाबादप्रमाणे बँकेत सौजन्य सप्ताह होता. साहजिकच ग्राहकांशी सौजन्याने बोलणे आले. सविताबाई आपल्या ग्राहकांना बोला आपली काय सेवा करू, असं गोड आवाजात म्हणू लागल्या आणि त्यांची कामंही पटापट करून देऊ लागल्या. एरवी, ग्राहकांशी तुसडेपणाने वागणाऱ्या सविताबाई आज मात्र ग्राहकांशी गोड बोलत होत्या. ग्राहकादेखील अचंबित होतं. पण आपलं काम लवकर होतंय, याचा आनंद त्यांना होता. एकदाचा कामाचा दिवस संपला. बाई आनंदातच घरी आल्या. आज त्यांना फारच मस्त वाटत होतं. घरी आल्या आल्या त्यांनी पर्स सोफ्यावर फेकून दिली आणि स्वतः भोवती मस्तपैकी एक छान घिरकी घेतली. त्याच मस्तीत पुटपुतल्या,"सौजन्य..सौजन्य....! खरंच किती छान वाटतंय!सगळ्यांनी सौजन्याने वागावे, सौजन्याने राहावे, सौजन्याने जगावे..."
बायकोला  आनंदी पाहून नवऱ्यालाही आनंद झाला. असेच नेहमी सौजन्याने दिवस यावेत असे त्याला वाटले. नवरोबा काहीतरी बोलणार तोच सविताबाई कडाडल्या,"माझ्या तोंडाकडे काय बघताय? आत जा आणि चहा करून आणा. कपडे धुतले नसतील तर ते धुवून घ्या. आपल्या पायरीनं वागावं माणसानं!तुमच्याशी सौजन्याने वागायला तुम्ही काय माझे ग्राहक नाही आहात. साधे नवरोबा आहात.समजलं?"
****************
बंड्याला क्रिकेटचं भारी वेड. वन डे मॅच असली की, हा बहाद्दर चक्क ऑफिसला दांडी मारून घरात टीव्ही समोर बसून असायचा. आजही असाच तो टीव्हीला चिटकून बसला होता. बानूला त्याचा फार राग यायचा. आजही ती त्याच्यावर चिडली होती.
"टीव्हीला चिटकून बसायचं होतं तर टिव्हीशीच लग्न करायचं होतं. मला कशाला इथं आणलीत?तुला माझ्यापेक्षा क्रिकेट आवडतं हे मला कळलं असतं तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं!" बानू फुसफूसली.
टीव्हीसमोरून न उठताच बंड्या म्हणाला,"असं काय करतेस बानू! चिडू नकोस अशी! अगं, तू मला फुटबॉलपेक्षा जास्त आवडतेस!"
*********
जतकर वकिलांना कवठेकर इन्स्पेक्टरांशी  भेटायचं होतं. त्यांनी आपली कार गाडी पोलीस स्टेशनसमोर थांबवली. आणि बायकोला म्हणाले,"पाचच मिनिटं थांब!मित्राला भेटून लगेच येतो. " असे म्हणून जतकर पोलीस ठाण्यात शिरले.
"हे बघ, बायको बाहेर गाडीतच आहे. आता थंडबिंड काही नको. मला एके ठिकाणी अर्जंट जायचं आहे."
यावर कवठेकर इन्स्पेक्टर भडकले. म्हणाले,"साल्या, वाहिणींचं माझ्याविषयी काय मत होईल. पोलीस खात्यातील आम्ही माणसं आधीच बदनाम!त्यात तू घराच्या लोकांपुढेही आम्हाला बदनाम करायला निघालास. काही नाही त्यांना येऊ दे आत. थंड काही पिऊ देत. निदान त्यांचं तर मत आमच्याविषयी चांगलं होऊ दे."
एक पोलीस कर्मचारी बाहेर आला आणि त्यांना आत बोलावलं. ते आत आल्या. त्यांनी पाहिलं की,तीन गुन्हेगारांचे फोटो भिंतीवर लावले होते. त्यांच्या फोटो खाली बक्षीसाची रक्कम लिहिली होती. त्यांना पकडून देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस  लिहिले होते.
थंड लस्सी पित वहिनींनी विचारलं,"भाऊजी! हे फोटो खरे आहेत?"
"हो, आम्हीच काढली आहेत ती."
"अहो मग, फोटो काढतानाच त्यांना पकडून ठेवायचं नाही का? तुम्हा पोलिसांची कमालच झाली! फोटो काढायचा आणि त्याला जा म्हणायचं. पुन्हा त्यांना पकडण्यासाठी इनाम जाहीर करायचं. वेंधळाच कारभार म्हणायचा!"
इन्स्पेक्टर कवठेकर यांची थंड लस्सी फुकट गेली होती.
*************

No comments:

Post a Comment