Saturday 6 June 2020

दणदणून हसा

पु. ल. प्रमुख पाहुणे होते. मुख्य समारंभानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. एका बाईंनी पु.लं.ना प्रश्न केला, "आपण अजून आत्मचरित्र का लिहिलं नाही?"
पु. ल. म्हणाले, "नाही लिहिलं!"
बाई म्हणाल्या, "तुम्ही ते लवकरात लवकर लिहावं
अशी आमची इच्छा आहे."
पु. ल.नी त्या बाईकडे डोळे मोठे करून पाहिलं अन्
म्हटलं, "म्हणजे माझं आता काही खरं नाही असंच ना?"
सारं थिएटर हास्यकल्लोळात बुडून गेलं.

●●●●●
डॉ. राही मासूम रझा एका खऱ्याखुऱ्या डॉक्टरबरोबर
गप्पा मारत बसले होते. इतक्यात एक फोन आला. डॉक्टर (वैद्यकीय) म्हणाले, "एक पेशंट सीरियस आहे. गेलंच पाहिजे."
"जाऊ दे यार", रझा म्हणाले, "एखाद्याला तरी नैसर्गिक रीतीने मरू दे की!"
●●●●●
एका प्रसिद्ध कवीच्या कवितासंग्रहाची माधव मनोहरांनी चिरफाङ केली. तो कवी संतापून माधवरावांना भेटायला आला.
"तुम्ही माझ्या कवितांना टाकाऊ म्हटलंत- यूसलेस
म्हटलंत. पण तुम्हाला माझ्या कवितासंग्रहावर टीका करायचा काहीही अधिकार नाही. कारण तुम्ही स्वतः कधी कविता केलीच नाहीये!"
"हे पाहा- मी कधी अंडं घातलं नाही. पण ऑम्लेट कसं
झालंय हे मी जगातल्या कुठल्याही कोंबडीपेक्षा चांगलं सांगू शकतो," माधवराव शांतपणे म्हणाले.
●●●●●
वकील- "अत्रेसाहेब, तुम्ही फिर्यादीला मूर्ख म्हणालात?"
अत्रे- "खरं आहे."
वकील- ''तुम्ही त्याला हलकट म्हणालात?"
अत्रे- "बरोबर."
वकील- "शिवाय हरामखोर, बदमाश असेही शब्द
वापरलेत?"
अत्रे- "नाही. तेवढं म्हणायला मी विसरलो. पण
त्याबद्दल हवं तर मी कोर्टाची माफी मागतो.'
●●●●●
"आपण आपल्या पत्नीला सांगा की हा बहिरेपणा
मामुली आहे. काळजी करण्याचं कारण नाही. वाढत्या वयाचं ते लक्षण आहे."
"काळजी करण्याचं कारण नाही इथपर्यंत मी सांगेन
डॉक्टर. पुढचं मात्र तुम्ही स्वतःच सांगा."
●●●●●
अत्रेच्या सभेत गडबड झाली. अत्रे म्हणाले, "जरा इकडे
कान करा."
एकाने सडका बटाटा फेकून म्हटलं, "हा घ्या!"
अत्रे म्हणाले, "हे बघा काय ते. मी कान द्या म्हटलं तर
यानं आपला मेंदूच दिला."
●●●●●
पु. ल. देशपांडे फ्रान्सला गेले होते तेव्हाची गोष्ट. ते रोज
एका हॉटेलात जेवायला जात. तिथं एक फ्रेंच माणूस नेमका त्यांच्याच टेबलावर बसत असे.
पहिल्या दिवशी तो जेवणाच्या आधी उठून म्हणाला,
"बॉन अॅपिटेट."
पु. ल.ही उठून म्हणाले, "पु. ल. देशपांडे."
असा प्रकार चारपाच दिवस चालला. शेवटी पु. ल.
कंटाळले. एका इंग्लिश माणसाला ते म्हणाले, "रोज तो मला नाव विचारतो, मी सांगतो. हे किती दिवस चालायचं?"
इंग्लिश माणूस म्हणाला, "अहो, तो तुमचं जेवण सुखाचं
होवो अशी सदिच्छा करतो."
दुसऱ्या दिवशी पु. लं.नी तो फ्रेंच माणूस येताच पटकन
म्हणाले, "बॉन अॅपिटेट'
फ्रेंच माणूस म्हणाला, "फुलऽऽऽ देसपाँद!"
●●●●●
एका उद्योगपतीने बाळ सामंतांना सल्ला दिला,
"दिवाळीच्या रात्री खिडक्या दार उघडी ठेवली तर लक्ष्मीला घरात प्रवेश करणं सोपं जाते."
बाळ सामंत म्हणाले, "तुम्हीसुद्धा दारं-खिडक्या उघडी
ठेवा. तुमच्या घरातून बाहेर पडली तरच आमच्या घरी येणार ना!"
●●●●●
एकदा मंगेश पाडगावकरांकडे एक तरुण आला.
पाडगावकरांनी विचारलं, "काय करता तुम्ही?"
"मी कविता करतो."
"तसं नव्हे- पोटापाण्याचा उद्योग?"
"कविता करतो हे पुरेसे नाही का? मला कवितेवर
जगायचं काही तरी काम द्या."
"तुमची एखादी कविता वाचून दाखवा." खरं तर
पाडगावकरांची वामकुक्षीची वेळ झाली होती.
"चंद्राचा चिरून कांदा, ब्रह्मांडाचे फोडून अंडे,
काळोखाची कोथिंबीर घालून, सूर्यचुलीवर मी घालीन
विश्वाचे ऑम्लेट."
ही कविता ऐकून पाडगावकर म्हणाले, "भल्या गृहस्था,
तू दोन जिने जास्त चढून आलास. तळमजल्यावर नित्यानंद उडिपी भवन आहे. तिथे तुला नक्की काम मिळेल.'
●●●●●

No comments:

Post a Comment