Sunday 22 March 2020

प्रामाणिक तस्कर

एकदा मुल्ला नसरुद्दीन राज्याच्या सीमेबाहेर जात असताना सीमेवरच्या पहारेकर्‍याने त्याला अडवले. कोण आहेस तू? त्याने दरडावत विचारले.
एक प्रामाणिक तस्कर, साहेब मुल्ला नसरुद्दीन म्हणाला.
प्रामाणिक तस्कर! पहारेकरी हसला व म्हणाला, मग सांग बरं, तू कशाची तस्करी करत आहेस? मुल्लाने त्यावर काही उत्तर दिले नाही. पहारेकर्‍याने मग मुल्लाची व त्याच्या गाढवावरच्या गवताच्या ओझ्याची झडती घेण्यास सुरुवात केली. जर तुझ्याजवळ काही तस्करीचे सामान मिळाले तर तुला मी कठोर दंड करीन. पहारेकरी झडती घेत म्हणाला.

माझ्याजवळ कोणतेच तस्करीचे सामान नाही. मुल्ला म्हणाला; पण पहारेकर्‍याने त्यावर विश्‍वास न ठेवता कसून झडती घेतली. त्याला काहीही तस्करीचे सामान आढळले नाही. त्याने मुल्लाला जाऊ दिले. दुसर्‍या आठवड्यात पहारेकर्‍याने मुल्लाला पुन्हा सीमेवर गाढवासह पाहिले. त्याने पुन्हा मुल्लाची झडती घेतली. पण यावेळीही काही आढळले नाही, असे अनेक महिने चालले. दरवेळी कठोर तपासणी करूनही तस्करीचे काही सामान आढळायचे नाही.
अनेक वर्षांनंतर तो पहारेकरी निवृत्त झाला. त्याने एकदा बाजारात मुल्लाला पाहिले. त्याची उत्सुकता तो लपवू शकला नाही. तो मुल्लाजवळ गेला व म्हणाला,तू तोच प्रामाणिक तस्कर आहेस ना? तू दर आठवड्याला गाढवावर गवत लादून सीमेबाहेर जायचास?
होय, बरोबर ओळखलंस. मुल्ला म्हणाला. त्या दोघांनी हस्तांदोलन केल्यावर पहारेकर्‍याने विचारले, मला एक सांग, मी एवढी वर्षे तुझी झडती घ्यायचो पण तुझ्याजवळ कोणतेच तस्करीचे सामान आढळायचे नाही. तू कसली तस्करी करायचास?
गाढवाची. मुल्ला शांतपणे म्हणाला.

No comments:

Post a Comment