आपली विश्वासू
भिकोबा कारकून होते. म्हणजे पगार यथातथाच. भरीस भर म्हणजे ते एकदम प्रामाणिक होते, लाच खाण्याच्या विरुद्ध. वर त्यांची पत्नी हेमलता. हिला भिकोबांपासून लागोपाठ आठ मुलीच झाल्या.
हेमलताचं निराश होणं तसं साहजिकच होतं.
हेमलतानं जवळच्या टेलरिंग फर्ममधल्या एका तरुण शिप्याबरोबर सूत जमवलं व ती त्याच्याबरोबर पळून गेली.
एके दिवशी भिकोबांना हेमलताचं पत्र आलं.
'मी असं वागायला नको होतं. माझी चूक झाली. तुमचं माझ्यावर किती प्रेम होतं याची मला आता जाणीव झाली आहे. मी परत येते आहे. शेवटी या नश्वर जगात पति-पत्नीचं प्रेम हेच काय ते अमर प्रेम.'
आपली विश्वासू
हेमलता
'ता. क. महाराष्ट्र राज्य लॉटरीत तुम्हाला पाच लाख रुपयांचं बक्षीस
मिळालं हे मी पेपरातच वाचलं. अभिनंदन!'
**************
तोटा
चिकटोपंतांना महाराष्ट्र राज्य लॉटरीचं पंचवीस हजाराचं बक्षीस लागलं. पण चिकटोपंतांचा चेहरा खुलला तर नव्हताच, उलट पार उतरला होता- पोरांमागून पोरं झाल्यावर स्त्रीचं तारुण्य ओसरावं तसा.
सौ. चिकटोपंतांनी विचारलं, "अहो, एवढं बक्षीस लागलं तरी चेहरा हा असा का?"
"मूर्ख!'' चिकटोपंत वैतागले, “मी दहा तिकिटं विकत घेतली होती आणि बक्षीस लागलं फक्त एका तिकिटाला बाकीची नऊ तिकिटं मी का घेतली हे देवच जाणे!"
%%%%%%
बाप होण्याचं पाप
प्रत्येक समारंभात व्यासपीठावर बसणारे काकासाहेब हे धनिक नामवंत गृहस्थ निधन पावले.
चित्रगुप्ताच्या दरबारात खोटे हिशेब ठेवायची पद्धत नसल्यानं काकासाहेबांची रवानगी सरळ नरकात झाली. काकासाहेबांनी स्वतःचं समाधान करून घेतलं, “इथं आपल्याला कोण ओळखणार आहे?"
तेवढ्यात त्यांना त्यांचा विश्वासू नोकर व्यंकाप्पा दिसला. व्यंकाप्पा आश्चर्यानं उद्गारला, "काकासाहेब, तुमच्यासारखा धनिक आणि या नरकात?"
"व्यंकाप्पा, नरकात तुझ्यापाशी खोटं बोलून काय उपयोग? मी कुळांना नाडलं, भाडेकरूंना छळलं, व्यापारात लबाडी केली आणि पैसा मिळवला; पण हे सर्व पाप मी का केलं? तर माझ्या बदमाष व पाजी मुलाकरिता. तो भानगडी करायचा आणि त्या निस्तरण्याकरिता मला वाईट मार्गानं पैसा मिळवावा लागला. बाप होणं हे पाप आहे बाबा! माझं राहू दे; पण व्यंकप्पा, तुझ्यासारखा इमानी नोकर इथं
कसा?" खाली मान घालून व्यंकप्पा म्हणाला, "काकासाहेब, तुमचं म्हणणं खरं आहे. तुमच्या त्या बदमाश व पाजी मुलाचा बाप झाल्याबद्दल मी ही शिक्षा भोगतो आहे.'
%%%%%%%%%%%%
पुणेकर : अडीच डझनची पेटी दाखवा, पण मी पेटी उघडून बघणार.
व्यापारी : बघा साहेब! पण भाव कमी नाही होणार.
पुणेकर : अरे अस्सल स्नागिरी दिसतोय,
व्यापारी: अरे वा! बरोबर ओळखले तुम्ही.
पुणेकर (मनात) : मला कोणीच फसवू शकत नाही. मी आंबे थोडेच बघत होतो. मी तर पेटीतला कागद बघितला. रत्नागिरीचा स्थानिक वर्तमान पत्राचा कागद होता.
व्यापारी (मनात) : अरे पुणेकरा, मी पण हाडाचा व्यापारी आहे. मी रत्नागिरीहून फक्त रद्दीच मागवतो. बाकी माल कर्नाटकचा आणतो.
&&&&&&&&&&&
घास खा रहे है
एकदा एक हिंदी मुलगा मराठी मित्राच्या लग्नाला येतो.त्याला मराठी पद्धतीचे लग्नविधी जाणून घ्यायचे असतात. लग्नानंतर जेवणाची पंगत बसते आणि नवरा नवरीला घास भरवायला लागतो. तेव्हा हिंदी मुलगा शेजारच्या गृहस्थांना विचारतो,' ये दोनो क्या कर रहे है?' गृहस्थ उत्तर देतात,' घास खा रहे है'!
&&&&&&&&&&&&
पायी चालावे लागले
कुशाभाऊ अहो, अशक्तपणा वाटू लागल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी औषध दिलं आणि तीन महिन्यात पायी चालत याल असे म्हणाले. विशाभाऊ मग झालं का त्यांनी म्हटल्याप्रमाणे? कुशाभाऊ त्यांच्याकडून उपचार घेण्यासाठी मला गाडी विकावी लागली आणि दवाखाण्यात पायी चालत जावे लागले.
No comments:
Post a Comment